बीड दि.७ – शाळेत न जाताच सरकारचे पाच आकडी पगार घेणाऱ्या दांडीबहाद्दर शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी सरकारने आता कंबर कसली आहे. त्यानुसार यापुढे प्रत्येक वर्गात त्या वर्गावर शिकविणाऱ्या शिक्षकाची छायाचित्रे लावण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांमध्ये आदराची भावना निर्माण व्हावी या हेतूने ‘आपले गुरूजी’ अभियान राबविण्यात येणार असले तरी प्रत्यक्षात आपल्यासाठी कोणते शिक्षक नेमले आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यातून बोगस शिक्षक कोण हे माहीत व्हावे यासाठी हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती
मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. सरकारी शाळामंधील अनेक शिक्षक पगार सरकारचा आणि काम मात्र दुसऱ्याचे असे करीत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. ग्रामीण भागात तर जिल्हा परिषद शाळांमधील बहुतांश शिक्षक पुढाऱ्यांच्या मागे फिरताना शाळेकडे फिरकतच नसल्याचे आढळले आहे. काही ठिकाणी तर नाममात्र वेतनावर परस्पर आपल्या जागी एखाद्या व्यक्तीची शिक्षक म्हणून नियुक्ती करीत सरकारडून मात्र गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकांची संख्याही अधिक आहे.