Site icon सक्रिय न्यूज

मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय….!

मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय….!
मुंबई दि.१० –  मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एकनाथ शिंदे सरकारची आज पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाईसाठी हेक्टरची मर्यादा वाढवण्याबरोबरच एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला.
                   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,  ‘आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे शतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यात पंचनामे झाले आहेत. काही ठिकाणी आणखी पंचनामे सुरु आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात 15 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शिवसेना आणि भाजपच्या सरकारने निर्णय घेतला आहे. आतापर्यंत इतकी कधीच नुकसान भरपाई मिळाली नव्हती, इतकी देण्याचा निर्णय झाला आहे.  एनडीआरएफच्या नियमांच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच दोन हेक्टरची मर्यादा वाढून तीन हेक्टर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळेल.’
                 दरम्यान, एनडीआरफच्या निकषानुसार, शेतकऱ्यांना हेक्टरी सहा हजार 800 रुपये मिळतात. शिंदे सरकारकडून याच्या दुप्पट रक्कम देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. शिंदे सरकारच्या निर्णायानुसार शेतकऱ्यांना आता 13, 600 रुपये मिळणार आहेत.
शेअर करा
Exit mobile version