केज दि.२० – गाडीची प्रतीक्षा करीत उभ्या असलेल्या २१ वर्षीय विवाहितेच्या विनयभंग प्रकरणातील तिघांच्या केज पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.
केज तालुक्यात माहेरी आलेली २१ वर्षीय विवाहित महिला दि.१७ ऑगस्ट रोजी परत पुणे येथे जाण्यासाठी केज-बीड महामार्गावरील बरड फाटा येथे गाडीच्या प्रतीक्षेत तिच्या दोन भावा सोबत थांबली होती. त्या वेळी हनुमंत ज्ञानोबा मुंडे ( रा. मुंडेवाडी ता. केज ), बाबुराव आप्पाराव ढाकणे, पंढरी अशोक ढाकणे ( दोघे रा. सारूळ ता. केज ) व इतर अनोळखी असे पाच जण तिथे आले. त्यांनी या महिलेस पाहून अश्लील बोलत तिचा विनयभंग केला. तिच्या भावांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता एका भावास लोखंडी पट्टी डोक्यात मारून डोके फोडले. तर दुसऱ्या भावास पाठीत दगडाने मारहाण करून मुक्कामार दिला. या वेळी तिचा पती ट्रॅव्हल्समधून आला असता तिच्या पतीला ट्रॅव्हल्स मधून खाली ओढून या पाच जणांनी लाथाबुक्याने मारहाण केली. अशी फिर्याद पीडित महिलेने केज पोलिसांना दिल्या वरून हनुमंत मुंडे, बाबुराव ढाकणे, पंढरी ढाकणे व इतर अनोळखी दोघे अशा पाच जणां विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी त्यांच्या अधिनिस्त अधिकाऱ्यांना त्या तिघांना तात्काळ जेरबंद करण्याचे आदेश दिले. पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस जमादार अभिमान भालेराव, मेसे, शेख रशीद यांनी दि. २१ ऑगस्ट रविवार रोजी त्यांचा तपास करून हनुमंत मुंडे, बाबुराव ढाकणे, पंढरी ढाकणे यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.