केज दि.२५ – जुगार खेळताना हरलेले व जुगार खेळण्यासाठी घेतलेले पैसे परत का देत नाही असे म्हणत सतत पैशाची मागणी करून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करीत केल्या जात असलेल्या त्रासास कंटाळून एका ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लाडेवडगाव ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
लाडेवडगाव ( ता. केज ) येथील दादाराव संजय कसबे ( वय ३० ) यास पत्ते, जुगार खेळण्याची सवय होती. त्याने जुगार खेळण्यासाठी गावातील सखाराम सुखदेव शेप यांच्याकडून २० दिवसापूर्वी ५०० रुपये घेतले होते. त्यांनी प्रत्येक दिवसाला ५०० रुपये व्याज आकारून २५ हजार रुपयांची मागणी करीत जातीवाचक शिवीगाळ करून चापट मारली. जोपर्यंत तु माझे पैसे परत देत नाहीस तोपर्यंत तुझा मोबाईल परत देणार नाही असे म्हणून काढून घेतला होता. तर जुगार खेळताना हरलेले गावातील काळ्या फुलचंद शेप यांनी २० हजार रुपयांची तर सोमनाथ शेप यांच्या सांगण्यावरून सचिन भागवत शेप यांनी ४० हजार रुपयांची मागणी करीत तगादा लावला होता. पैसे नाही दिले तर शेतात कामाला येऊन पैसे परत कर. तुला गावात राहू देणार नाही अशा सारख्या धमक्या देत होते. तर त्याच्या आईने कानातील सोन्याचे फुल मोडून त्यांना त्याचे पैसे परत कर असे सांगून भाचा रवि रतन लोंढे यास त्याचे सोबत जाण्यास सांगितले होते. त्यास जवळील १० हजार रुपये दिले होते. मात्र वरील तिघांकडून होत असलेल्या त्रासास कंटाळून दादाराव संजय कसबे ( वय ३० ) याने २४ ऑगस्ट रोजी राहत्या घरातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सायंकाळी ६.३० वाजता उघडकीस आले. अशी फिर्याद त्याची आई पार्वती संजय कसबे यांनी दिल्यावरून सखाराम शेप, काळ्या शेप, सचिन शेप, सोमनाथ शेप या चौघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कुमावत हे करीत आहेत.
दरम्यान, संबंधित लोकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत नातेवाईकांनी गुरुवारी ठाण्यात ठिय्या मांडला होता. त्यानंतर आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे व अनुसूचित जाती – जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.