मुंबई दि.२६ – दुभंगलेली शिवसेना आणि भाजप-शिंदेसेनेला वाढता पाठिंबा अशा स्थितीत राज्यात एक महत्त्वाचं समीकरण उदयाला आलं आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षांनी एकत्र येणार असल्याचं जाहीर केलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली.
आज दुपारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते. महाराष्ट्रात सध्या प्रादेशिक पक्ष संपवून टाकण्याचं कट कारस्थान सुरु आहे. या पार्श्वभूमवीर शिवसेनेत या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी, व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.या लढवय्या सहकाऱ्यांचं स्वागत करतोय. फक्त महाराष्ट्रातच नाही तर प्रादेशिक पक्ष चिरडून टाकणं यालाच लोकशाही मानणारे लोकं बेताल वागत आहेत. येत्या काही काळात सुप्रीम कोर्टात जो लढा सुरु आहे, हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचाच आहे असे नाही. देशात लोकशाही असेल का बेबंदशाही, याचा निकाल लागणार आहे. असो. पण आपण संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलो पाहिजेत. प्रादेशिक अस्मिता टिकावण्यासाठी एकत्र आलो पाहिजेत. आपण सगळे शिवप्रेमी आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ आपण सगळे एकच आहोत. मराठी माणसाला दुहीचा शाप गाढत आलाय. या शापालाच आपण गाढून टाकूत असेही ते म्हणाले.