स्मशानभूमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहते ते सर्वत्र झाडंझुडपं वाढेलली, मृतावरील अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारलेली दोन पात्र्याची शेड, ना बसायला जागा ना उभं राहावं वाटावं अशी भीतीदायक परिस्थिती. मात्र माणसाचा शेवट अगदी स्वच्छ आणि सुंदर परिसरात करणारी एक वेगळी स्मशानभूमी परभणीत आहे. महत्त्वाचे म्हणजे या स्मशानभूमीला इथल्या सुविधांमुळे आयएसओ मानांकन (ISO Certification) मिळालं आहे. आयएसओ मानांकन मिळवणारी जिल्ह्यातील हि पहिली स्मशानभूमी ठरली आहे.
परभणीपासून 18 किलोमीटर अंतरावर असलेलं झरी हे गाव. दुधना नदीच्या काठावर तब्बल 15 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं झरी हे गाव. गावातील प्रगतशील शेतकरी कृषिभूषण कांतराव देशमुख हे उपक्रमशील असतात. झरीचे 25 वर्ष ते सरपंच होते. त्यांच्या पत्नी गंगाबाई या 2002 साली जिल्हा परिषदेच्या सभापती असताना गावात एक चांगली स्मशानभूमी असावी हा विचार घेऊन कांतराव देशमुख यांनी काम सुरु केलं.
झरीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दुधना नदीकाठी त्यांनी स्मशानभूमी उभारण्याचं काम सुरु केलं. एका एकरमध्ये त्यांनी तिथे स्मशानभूमी उभारुन संरक्षण भिंत बांधली. एकाच वेळी तीन जणांवर अंत्यसंस्कार करता येतील एवढं मोठं शेड बांधलं. याच स्मशानभूमीला त्यांनी त्यांच्या ‘मातोश्री इंदिराबाई देशमुख वैकुंठधाम’ असं नाव दिलं. देशमुख यांनी सातत्याने मागील 10 ते 15 वर्षात या स्मशानभूमीचा कायापालट केला. स्मशानभूमी परिसरात रंगरंगोटी, अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटचे बेंच, जागोजागी वड, पिंपळ, कडुनिंब, आंबा, चिंच, आवळा आदी वृक्ष मोठ्या प्रमाणावर लावून त्याचं ‘ऑक्सिजन पार्क’ असं नामकरण केलं आहे. याच परिसरात एक बोअर घेऊन त्याला हातपंपही त्यांनी बसवलाय, ज्याचं पाणीही या झाडांना जातं. रात्रीच्या वेळी अंधार राहू नये यासाठी विद्युत पोल उभारुन रोषणाई देखील केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी गावासाठी एक मोफत अंत्यविधी रथही सुरु केला आहे.
झरीतील याच ‘मातोश्री इंदिराबाई देशमुख वैकुंठधाम’ स्मशानभूमीत कांतराव देशमुख यांनी उभारलेल्या सर्व भौतिक सुविधा आणि इतर बाबींच्या आधारे उभारलेल्या या स्मशानभूमीला नुकतंच आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. आयएसओ मानांकन मिळवणारी परभणी जिल्ह्यातील पहिली स्मशानभूमी म्हणून झरीला बहुमान मिळाला आहे.
‘एक गाव एक स्मशानभूमी’ सारखा आदर्श उपक्रम कांतराव देशमुख यांनी झरीतील स्मशानभूमीचा तर कायापालट केलाच शिवाय त्यांनी जिल्ह्यात ‘एक गाव एक स्मशानभूमी’ ही संकल्पना राबवली, ज्यात 80 पेक्षा जास्त गावांनी सहभाग घेतला असून झरीप्रमाणेच या स्मशानभूमी येणाऱ्या काळात सुंदर आणि प्रशस्त होण्याकडे वाटचाल करत आहेत.
दरम्यान, गावागावातील स्मशानभूमी अडगळीत पडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांनी झरीप्रमाणेच एक आदर्श स्मशानभूमी उभारण्यासाठी पुढाकार घेऊन गावातील स्मशानभूमी सुंदर, स्वच्छ, प्रशस्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्यांना काही मदत लागेल ती करण्यासाठी मी सदैव तयार आहे, अशी प्रतिक्रिया कांतराव देशमुख यांनी यावेळी दिली.