Site icon सक्रिय न्यूज

एकाच रात्रीत तीन घरे फोडली, दागिन्यांसह रोख रक्कम लंपास…..! 

एकाच रात्रीत तीन घरे फोडली, दागिन्यांसह रोख रक्कम लंपास…..! 
केज दि. 29 – अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडून घरातील रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा ३९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना केज तालुक्यातील सातेफळ येथे घडली. या प्रकरणी युसुफवडगाव पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
       केज तालुक्यातील सातेफळ येथील श्रीहरी बाबुराव चंदनशिव हे मागील आठ दिवसापूर्वी घराला कुलूप लावून लातुरला गेले होते. २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घराची झडती घेत चोरट्यांनी धान्याचे कोठीत साड्यात ठेवलेले त्यांच्या पत्नीच्या कानातील १० हजार रुपयांचे ५ ग्रॅमचे सोन्याचे झुंबर व २० हजार रुपयांच्या प्रत्येकी ५ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या नेल्या. त्यानंतर चोरट्यांनी विशाल नरहरी थोरात यांच्या घराकडे मोर्चा वळविला. त्यांच्या आई घराबाहेर झोपलेल्या रुममध्ये प्रवेश करून चोरट्यांनी लाकडी पेटी बाहेर उचलून नेत थोड्या अंतरावर पेटी फोडून पेटीत ठेवलेले नगदी ४ हजार रुपये, २ हजार रुपयांची सोन्याची नथ व लक्ष्मीच्या सणासाठी आणलेले समान काढून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांचे भिवाजी वनवे यांच्या घरात घुसून घरातील लोंखडी कपाट उघडुन त्यामध्ये ठेवलेली ३ हजार रुपयांची रक्कम घेतले. चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडून ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, नगदी ७ हजार रुपये असा ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे गावातून पसार झाले. विशाल थोरात यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार रामधन डोईफोडे हे पुढील तपास करत आहेत.

साळेगाव येथून दुचाकी लंपास 

राजेगाव ( ता. केज ) येथील बाळासाहेब अंगद मेटे हे २५ ऑगस्ट रोजी साळेगाव येथील जनावरांच्या बाजारात दुचाकी ( एम. एच. ४४ एच. ७३४९ ) लावून बैल खरेदी करण्यासाठी गेले. पाळत ठेवून अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शेअर करा
Exit mobile version