केज दि.३० – तालुक्यातील मस्साजोग येथे वाहन थांबविण्याच्या कारणावरून एकाने चक्क एसटीच्या वाहकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी केज पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, मंगळवार दि. ३० जून रोजी सकाळी ९:१५ वा. जालना आगाराची एसटी बस जालना-कलबुर्गी (एम एच-२०/ बी एल-४०८३) कलबुर्गीकडे जात असताना मस्साजोग येथील थांब्यावर प्रवाशांची चढ-उतार करीत असताना सुदर्शन देशमुख रा. मस्साजोग याने वाहक नितीनकुमार प्रल्हादराव तायडे यास मारहाण केली आणि शासकीय कामात अडथळा आणला.
दरम्यान, चालक-वाहकांनी गाडी केज पोलीस ठाण्यात आणून मारहाण करीत शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या सुदर्शन देशमुख याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.