Site icon सक्रिय न्यूज

बसमधून उतरताना महिलेचे साडेतीन लाखांचे दागिने लंपास…..!        

बसमधून उतरताना महिलेचे साडेतीन लाखांचे दागिने लंपास…..!        
केज दि.३ – मागच्या दोन वर्षांपूर्वी केज बसस्थानकात चोरी करणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद केली होती. आणि पुन्हा तशीच टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. कारण बसमधून उतरत असलेल्या महिलेच्या पर्समधील पाकिटात ठेवलेले ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे दागिने अज्ञात अनोळखी महिलांनी गर्दीचा फायदा घेत लंपास केल्याची घटना केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात दोन महिलांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
       केज तालुक्यातील नाव्होली येथील वृद्ध शेतकरी महादेव विठ्ठल जगताप यांची मोठी विवाहित मुलगी चंद्रकला ही महिला  २ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता औरंगाबाद येथून मुलीसह लक्ष्मी देण्यासाठी व भाऊ श्रीराम याच्या मुलाला पाहण्यासाठी माहेरी नाव्होली येथे औरंगाबाद – अंबाजोगाई बसने येत होत्या. त्यांनी येताना ५९ ग्रॅमचे विविध प्रकारचे दागिने हे पर्समधील पाकिटात ठेवले होते. तर महादेव जगताप हे मुलगी व नातीला घेऊन जाण्यासाठी केज शहरातील शिवाजी चौकात बसची वाट पाहत बसले होते. ही बस दुपारी १२ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी चौकात येऊन थांबली असता चंद्रकला व त्यांची मुलगी पूजा या दोघी बसमधून उतरत असताना बसमध्ये पाळत ठेवून असलेल्या दोन अज्ञात महिलांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पर्समधील पाकिटात ठेवलेले २५ ग्रॅमचे सोन्याचे पट्टी गंठण, १० ग्रॅमचे मिनी सोन्याचे गंठण, ८ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, साडेआठ ग्रॅमचे सोन्याचे झुमके फुले, ४ ग्रॅमचे सोन्याचे मणीमंगळसुत्र, ५ ग्रॅमचे पत्ता मणी, १ ग्रॅमचे कानातील कुंडल, अर्धा ग्रॅमची सोन्याची नथ असे एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला.
                 महादेव जगताप यांच्या फिर्यादीवरून अनोळखी दोन महिलांविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version