केज दि. ५ – केज – मांजरसुंबा रस्त्यावरील पिंपळगाव फाट्यावर पोलिसांनी छापा मारून तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या ७ जणांना पकडले. त्यांच्याकडून ४ हजार ५५० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज – मांजरसुंबा रस्त्यावरील पिंपळगाव फाट्याजवळील हनुमंत धस यांच्या हॉटेलच्या पाठीमागे काही लोक जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती केज ठाण्याचे प्रमुख सपोनि शंकर वाघमोडे यांना मिळाली. त्यांच्या आदेशावरून पोलीस कर्मचाऱ्यांनी ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी लक्ष्मण शामराव केदार, महादेव सखराम केदार, नानाभाऊ काशीनाथ केदार, सचिन चंपत शिंदे ( चौघे रा. सांगवी ता. केज ), निळुकांत वामन शिंदे ( रा. एकुरका ), बिभीषण मधुकर केदार, हनुमंत तुकाराम धस हे ७ जण बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायद्यासाठी तिर्रट नावाचा जुगार खेळताना असताना त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ४ हजार ५५० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस नाईक शमीन पाशा यांच्या फिर्यादीवरून वरील सात जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक दिलीप गित्ते हे करत आहेत.