Site icon सक्रिय न्यूज

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या……!

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या……!
केज दि.१३ – घर बांधकाम करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन का येत नाहीस या कारणावरून सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळास कंटाळून एका २६ वर्षीय विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ढाकेफळ ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तर पती, दिरास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
     ढाकेफळ ( ता. केज ) येथील मयत शिल्पा योगीराज घाडगे हिचा विवाह आठ वर्षांपूर्वी योगीराज भिवाजी घाडगे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुली, एक मुलगा अशी तीन अपत्य झाली. त्यानंतर घर बांधकाम करण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये म्हणून पती योगीराज घाडगे, सासू लक्ष्मीबाई घाडगे, दिर बाळासाहेब घाडगे, जाऊ माया घाडगे यांनी शिल्पा हिस तगादा लावला. मात्र तिने तेवढी रक्कम माहेरहून आणण्यास नकार दिल्याने त्यांनी तिला सतत शिवीगाळ व मारहाण करीत तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळास कंटाळून शिल्पा घाडगे हिने ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र १० सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता उपचार सुरू असताना शिल्पा योगीराज घाडगे हिचा मृत्यू झाला. अनिता दिलीप सिरसट ( रा. फुले नगर, धारूर ) यांच्या फिर्यादीवरून पती योगीराज घाडगे, सासू लक्ष्मीबाई घाडगे, दिर बाळासाहेब घाडगे, जाऊ माया घाडगे या चौघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
    दरम्यान, गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, फौजदार आर. जे. शेख, पोलीस नाईक शामराव खनपटे यांनी पती योगीराज घाडगे, दिर बाळासाहेब घाडगे यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
शेअर करा
Exit mobile version