केज दि.१९ – रविवारी सायंकाळी तालुक्यातील कोरडे वाडी येथील बळीराम अश्रूबा यादव या तरुणाचा पिंपळगाव ते सांगवी दरम्यान असलेल्या पुलावर टाकलेल्या मातीमुळे अपघात झाला. आणि आज पुन्हा त्याच ठिकाणी टेम्पो पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे.
काल झालेल्या अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्याची प्रकृती नाजूक झाली. त्याच्यावर बीड येथे उपचार सुरू आहेत.सदर अपघात घडूनही एचपीएम कंपनीने कसल्याच प्रकारची दखल न घेतल्याने आज सोमवारी सायंकाळी पुन्हा त्याच ठिकाणी केजकडून बीडकडे जाणारा टेम्पो सदर मातीत गेल्याने पलटी झाला आहे. टेम्पो पलटी झाल्यानंतर तो रोडवर आडवा झाला त्यामुळे सुमारे अर्धा तास वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
दरम्यान, सदरील अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नसली तर त्याच वेळेस एखादे अन्य वाहन त्याठिकाणी आले असते तर मात्र धोका होता.त्यामुळे एचपीएम कंपनीची ही बेफिकिरी किती दिवस सहन करायची ? अन किती बळी सहन करायचे ? याला सर्वसामान्य लोकांकडे कसलेच उत्तर नाही. अन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना सर्वसामान्यांचे कांही देणे घेणे नाही असेच यावरून दिसत आहे.