केज दि.२१ – मागच्या चार दिवसांपूर्वी केज मांजरसुम्बा रोडवरील पिंपळगाव ते सांगवी दरम्यान झालेल्या दुचाकी अपघातातील तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
केज मांजरसुम्बा दरम्यान एचपीएम कंपनीच्या माध्यमातून रोडचे काम सुरू आहे. पिंपळगाव ते सांगवी दरम्यान असलेल्या पुलावर मागच्या पंधरा दिवसांपूर्वी थोडे काम करण्यात आले होते, आणि त्याला वॉटरिंग साठी पुलावर एका बाजूला माती टाकली होती.परंतु सदर ठिकाणी दोन्ही बाजूला कसल्याच प्रकारची कंपनीने खबरदारी न घेतल्याने रात्रीच्या वेळी वाहनधारक थेट त्या माती टाकलेल्या रस्त्यावर जात होते.आणि अश्याच प्रकारे केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील बळीराम अश्रुबा यादव हे ही रविवारी (दि.१८) सायंकाळी रोडवरील माती न दिसल्याने अपघात झाला होता.सदर अपघातात बळीराम यादव यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती.त्यांना प्राथमिक उपचार करून अंबाजोगाई येथे हलवण्यात आले होते.परंतु त्यांची ओळख दोन दिवसांनी उशिरा पटल्याने पुढील उपचारासाठी विलंब झाला.मात्र अंबाजोगाई येथून त्यांना बीडलाही हलवण्यात आले होते.परंतु उपचारादरम्यान मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.बुधवारी कोरडे वाडी येथे सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान सदर अपघात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच ठिकाणी एक टेम्पो पलटी झाला होता.त्यामुळे रस्त्याचे काम करताना संबंधित यंत्रणेचा निष्काळजीपणा वाहन धारकांच्या जीवावर बेतत असून नागरिक एचपीएम कंपनी विरोधात रोष व्यक्त करत आहेत.