देवीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण जागीच ठार झालेत. तर एक गंभीररीत्या जखमी झाला. स्विफ्ट कार आणि एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला तर एसटी बसचंही प्रचंड नुकसान झालं. अपघातामुळे स्विफ्ट कार आणि एसटी बस यांची झालेली अवस्था पाहून ही धडक किती भीषण होती, याची कल्पना करता येऊ शकेल.सदर दुर्दैवी घटना लातूर उदगीर प्रवासा दरम्यान घडली.
तुळजापूर देवीचं दर्शन घेऊन लातूर जिल्ह्यातील उदगीरकडे भाविक परतत होते. मारुती स्विफ्ट कारने ते घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. भाविकांची कार वेगात समोरुन येणाऱ्या एसटी बसला धडकली आणि हा अपघात घडला. उदगीरच्या एका हॉस्पिटलमध्ये काम कऱणारे काही जण आणि नर्सिंग कॉलेजचे 2 विद्यार्थी उदगीर शहराकडे निघाले होते. हैबतपूर पाटी जवळ आल्यानंतर पुढून येणाऱ्या बसला कारने समोरासमोर जोरदार धडक झाली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या एकाला तातडीने लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मृतांमध्ये अलोक खेडकर (वय-21) रा. उदगीर
अमोल देवक्तते (वय-24) रा. रावणकोळ ता. मुखेड जि. नांदेड
कोमल कोद्रे (वय-22) रा. दोरनाळ ता. मुखेड जि. नांदेड
यशोमती देशमुख (वय-28) रा. यवतमाळ, नागेश गुंडेवार (वय-27) रा. उदगीर यांचा समावेश आहे.
एसटी बस ही उदगीरहून चाकूरकडे निघालेली होती. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर कारमधील भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी चक्क गाडीचा पत्रा कापावा लागला. गॅस कटरच्या साहाय्याने गाडीचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. पाच तरुणांच्या मृत्यूने उदगीर शहरावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, प्रियंका बनसोडे (वय-22) ही तरुणी या अपघातातून बचावली असली, तरी ती जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आपल्या सोबत असलेल्या पाच जणांच्या अपघाती मृत्यूने प्रियंकाला मोठा धक्का बसलाय.