राज्यातील गोरगरीब जनतेची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. कारण शिंदे- फडणवीस सरकार रेशन कार्ड धारकांसाठी रवा, चणाडाळ, साखर आणि तेल यांचे प्रत्येकी एक-एक किलोचे पॅकेज अवघ्या शंभर रुपयात देणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. घरगुती गॅसपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. अशा परिस्थितमध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांची आणि गरजूंची दिवाळी गोडाधोडाची व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.राज्यातील सुमारे १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. शिधा पत्रिका धारकांना रवा, चणाडाळ, साखर व तेल (प्रत्येकी एक किलो पॅकेज) केवळ शंभर रुपयांत दिले जाणार आहेत.