राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. पावसानं उघडीप दिला आहे. परतीच्या पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार झालं आहे. सध्या जरी पावसानं उघडीप दिली असली तरी हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पुणे वगळता अन्य जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या राज्यात पावसानं उघडीप दिली आहे. परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. कालपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पाच ते दहा ऑक्टोबर या कालावधीत राज्यातून मान्सून माघारी फिरणार आहे. अशातच आज हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
यंदा पावसाळ्यात सुरुवातील जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. त्यानंतर मात्र, जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात राज्यात तुफान पाऊस झाला. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सरासरीपेक्षा 23 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाल्याचे पाहायला मिळालं. यामुळं शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच रस्ते घरे, जनावरे यांचंही मोठं नुकसान झालं. 23 लाख हेक्टरहून अधिक शेतजमीन अतिवृष्टीमुळं बाधित झाली आहे. दरम्यान, दमदार पावसामुळं राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे.
परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण
5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दुसरीकडे वायव्य राजस्थान आणि गुजरातमधील कच्छमधून मान्सून आधीच माघारी परतला आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणासह दिल्लीतूनही मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळं आता पावसाची शक्यता कमी आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळं सध्या राज्यात पावसाची शक्यता कमी आहे.