बीड, दि. १४ – शिक्षण क्षेत्रातील एक मोठा चेहरा तथा औरंगाबाद चे काँग्रेसचे नेते किरण पाटील यांनी दि.१४ रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील भाजप कार्यालयात भाजपमध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. सदरील प्रवेशानंतर किरण पाटील यांना शिक्षक मतदारसंघासाठी विक्रम काळे यांच्याविरोधात भाजपकडून रणांगणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
संपूर्ण मराठवाड्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे असणाऱ्या किरण पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आगामी शिक्षक आमदार हा भाजपचाच असणार असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.मूळ बीड जिल्ह्यातील रहिवाशी असलेले किरण पाटील यांचा संपुर्ण मराठवाड्यात दांडगा संपर्क आहे. तर त्यांच्या जवळपास ६५ शिक्षण संस्था असून याच शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून त्यांना मानणारा एक मोठा शिक्षक वर्ग त्यांच्या पाठीशी उभा आहे. आणि आता किरण पाटील यांचे नाव समोर आल्याने भाजप एक शिक्षण क्षेत्रातील एक मोठा चेहरा विक्रम काळे यांच्याविरोधात उभा करत असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे व तसे संकेतही श्री.बावनकुळे यांनी दिले असून कामाला लागण्याच्या सूचना आणि शुभेच्छा ही दिल्या आहेत.
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, किरण पाटील हे पक्षात आल्याने पक्षाची ताकत वाढणार असून ते जेंव्हा रणांगणात उतरतील तेंव्हा समोरचा प्रतिस्पर्धी चारिमुंडया चित झाल्याशिवाय राहणार नाही.तर यापुढे आपल्याला घड्याळ बारामतीत बंद पाडायची असून मशाल वरळी मध्ये समुद्रात नेऊन बुडवायची आहे तर पंजा ला साकोलीत हरवायचे असल्याचेही बोलून दाखवले.
दरम्यान किरण पाटील यांच्याबरोबर प्रातिनिधिक स्वरूपात सुमारे दीडशे कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.यावेळी केंद्रीयमंत्री भागवत कराड, राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे, आ. देवयानी फरांदे, श्वेता महाले, अभिमन्यू पवार, महामंत्री संजय कोडगे, अरविंद पाटील निलंगेकर, प्रवीण घुगे, शिक्षक संघाचे प्रभारी मनोज पांगारकर यांची उपस्थिती होती.