केज दि.१४ – यापूर्वीही अनेकांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे गायब झाल्याचे प्रकार घडलेले आहेत. परंतु यामध्ये खाते धारकांची काहींना काही दिशाभूल करून, ओटीपी घेऊन पैसे पळवल्याच्या घटना वारंवार ऐकायला मिळतात.परंतु केज तालुक्यातील एका बँक ग्राहकाचे पैसे ओटीपी न मागताच ऑनलाईन गायब झाले असून सदरील बँक ग्राहकाने बँकेत लेखी तक्रार दिली आहे.
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील रहिवासी शरद शिवाजी राऊत यांचे गावातीलच महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते (80016515155) आहे. त्यांचा स्वतः चा व्यवसाय असल्याने सदरील खात्यावरून ते नेहमीच व्यवहार करत असतात. मात्र दि.14 जुलै रोजी त्यांनी कसल्याही प्रकारचा व्यवहार न करता त्यांच्या खात्यावरून 10 हजार रुपये डेबिट झाल्याचा मोबाईल वर मेसेज आला. सदरील प्रकाराने ते गोंधळून गेल्याने त्यांनी तात्काळ बँकेत धाव घेऊन विचारणा केली असता ऑनलाईन पैसे डेबिट झाल्याचे सांगण्यात आले.
वास्तविक पाहता ऑनलाईन व्यवहारासाठी ओटीपी ची गरज लागते. मात्र त्यांच्या मोबाईल वर कसल्याच प्रकारचा ओटीपी न येताच 10 हजार रुपये परस्पर डेबिट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सदरील प्रकारची राऊत यांनी बँकेत लेखी तक्रार दिली असून सदरील तक्रार नोंदवली असल्याची माहिती संबंधित शाखाधिकारी यांनी दिली आहे. अश्या प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वारंवार घडत असल्याने बँक ग्राहकांची चिंता वाढत आहे.