केज दि.२४ – नजर हटी दुर्घटना घटी असे म्हणतात. असाच कांहींसा प्रकार केजमध्ये घडला आहे. एटीएम कार्डचे पीन नंबर बदल्याण्यासाठी एटीएम सेंटर मध्ये गेलेल्या एकाचे तेथे उभ्या असलेल्या एका ठकाने नजर चुकवून एटीएम कार्ड बदलून त्यातून परस्पर ३८ हजार रु. काढले आहेत.
दि. १३ ऑक्टोबर रोजी शिवदास हरीदास करांडे रा. केकतसारणी ता. केज हे सकाळी ११ वा. च्या सुमारास त्यांचे नवीन एटीएम कार्ड आलेले असल्याने कळंब रोड वरील स्टेट बँक ऑफ इंडीया शाखेच्या एटीएम मशीनमध्ये पीन चेंज करण्यासाठी गेले होते. त्यांनी एटीएम कार्ड मशीन मध्ये टाकुन त्याची पीन मोबाईलमध्ये पाहत असताना; एटीएम सेंटर मध्ये उभ्या असलेल्या अनोळखी इसमाने नजर चुकवुन एटीएम कार्ड काढून मशीनमध्ये दुसरे एटीएम कार्डची अदलाबदली केली. शिवदास करांडे हे बदललेला पीन नंबर पाहुन निघुन गेले. त्यानंतर त्यांना मोबाईलवर सकाळी ११:५७ वाजता एटीएम कार्ड आधारे ५ हजार रु., ९ हजार ५०० रु., ५ हजार रु.,९ हजार ५०० रु., ९ हजार ५०० रु. असे एकुण ३८ हजार ५०० रु. एटीएम द्वारे काढल्याचा मेसेज आला. म्हणून शिवदास करांडे हे स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा रोजा मोहल्ला येथील एटीएम जवळ गेले. तेव्हा तेथे त्यांना पीन बदली करीत असताना अनोळखी इसम आढळुन आला. शिवदास करांडे यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला; तेव्हा त्याने शिवदास यांना हिसका देऊन निघुन गेला.
या प्रकरणी शिवदास करांडे यांच्या तक्रारी वरून त्या अनोळखी ठका विरुद्ध दि. २२ ऑक्टोबर रोजी केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ४८०२०२२ भा. दं. वि. ३७९ नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे करीत आहेत.