Site icon सक्रिय न्यूज

धाक दाखवत चालकासह ऊसतोड मजुरांना जबरदस्तीने पळवले……!

धाक दाखवत चालकासह ऊसतोड मजुरांना जबरदस्तीने पळवले……!

केज दि.२५ –  ऊसतोड मजुरांना सोलापूर जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी घेऊन जात असलेला टेम्पो केज येथे अडवून चालकाला एका गाडीत बळजबरीने बसवून पळवून नेले आणि त्यांना मारहाण केली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात पंधरा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          परभणी जिल्ह्यातील अंगलगाव ता. जिंतूर येथील प्रदिप साहेबराव राठोड हा त्याच्या मालकीच्या आयशर टेम्पो-१११० क्र. ( एम एच-२६/ए डी-१४७) ने इटोली ता. जिंतूर येथून उडतोड मुकादम श्रीराम बळीराम जाधव रा. घेवडा ता. जिंतूर यांचे १४ ऊसतोड मजूर व त्यांची ४ मुले यांना घेऊन सोलापूर जिल्ह्यातील सापटने (भो.) ता. माढा येथे जात होता. त्यांना दि. २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२:३० वा. केज-अंबाजोगाई रोडवर केज येथे एका लाल रंगाचा बोलेरो गाडी आडवी लावून टेम्पो अडविला. त्या नंतर एक बोलेरो व दोन स्कॉर्पिओ गाड्याती १५ लोकांनी हातात प्लस्टिकचे दांडे घेऊन आयशर टेम्पोत चढून त्यांनी प्रदीप राठोड याचा मोबाईल काढून घेतला तर इतरांनी मजुरांचेही मोबाईल काढून घेतले आणि त्यांच्या मागे गाडी घ्या म्हणून धमकी दिली. प्रदीप राठोड यांनी नकार देताच त्यांनी प्रदीप राठोड आणि मजुरांना दांड्यानी मारहाण केली व टेम्पोचा काच फोडला. चालक प्रदीप याला टेम्पोतून खाली ओढून लाल रंगाच्या बोलेरो गाडीत बसविले आणि टेम्पो व त्यातील मजुरासह त्यांना सोलापूर जिल्ह्यातील कव्हे ता. माढा येथे घेऊन गेले. त्यांचा मुकादम याने ही माहिती कुर्डुवाडी जि. सोलापूर पोलीस ठाण्यात देताच कुर्डुवाडी पोलिसांनी मजुरांना घेऊन उपचारासाठी दवाखाण्यात नेले.

          दरम्यान, केज पोलिस ठाण्यात हजर होऊन यांना पळवून घेऊन जाणारा मुकादम राहुल चोपडे आणि त्याचे इतर १४ साथीदार अशा १५ जणांच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

शेअर करा
Exit mobile version