बीड दि.30 – गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनावरांची वाहतूक होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आणि अशीच एक घटना बीड जिल्ह्यात समोर आली असून मोठ्या प्रमाणावर जनावरे पोलिसांनी ताब्यात घेत आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक 30 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नेकनूर गावाच्या बाजूच्या परिसरामध्ये कंटेनर मध्ये गोवंश जातीचे जनावरे भरून नेकनूर ते केज मार्गे तामिळनाडू राज्यात कत्तलीसाठी जाणार आहेत. सदर माहिती मिळाल्याने नेकनूर ते केज रोडवर येलंब घाट येथील उड्डाण पुलाजवळ पोलिसांनी सापळा लावला असता एक लीलांड कंपनीचा कंटेनर KA 51 AD 9009 छापा टाकून पकडण्यात आला. त्यामध्ये गोवंश जातीची 35 बैल जनावरे आढळून आली. या कारवाई मध्ये वाहनाचा चालक प्रभाकरण एस सुब्रमण्यम, वय 29 वर्षे राहणार तोंडामतुर जिल्हा कोईमतुर राज्य तामिळनाडू, के मोहनसुंदरम किट्टूचामी वय 35 वर्ष राहणार निळीपारा तालुका चित्तूर जिल्हा पलक्कड राज्य केरळ, एम कोबाल, वय 50 वर्षे रा. कंबब ता. उदमबाळायम जि. तेनी राज्य तामिळनाडू, व्हि.मुर्ती वय 35 वर्ष रा. संकरी जिल्हा- सेलम राज्य तामिळनाडू हे चार आरोपी तसेच वाहनाचा मालक, नेकनूर येथील व्यापारी मुस्तकीन उर्फ मुकु कुरेशी, केरळ येथील व्यापारी माणिक रा. केरळ असे एकूण 08 आरोपी यांच्याविरुद्ध गोवंश जातीचे बैल जनावरे वाहनामध्ये आच्छादन न टाकता,कोंबून त्यांचे पाय बांधून दाबून क्रूरतेने भरून, वाहतुकीचा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा कोणताही परवाना नसताना विनापरवाना, गोवंश जातीची जनावरांची वाहतूक करून त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून सदर जनावरांची पशुवैद्यकीय तपासणी न करता क्षमतेपेक्षा अधिक गोवंश जातीची जनावरे दाटीवाटीने वाहनात भरून, निर्दयपणे वाहतूक करताना त्यांची कत्तल करण्यासाठी घेऊन जात असताना मिळून आले.
त्यामुळे कलम 5 (अ)1 (ब)महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 (सुधारणा 2015 )सह कलम 119 महाराष्ट्र पोलीस कायदा,सह कलम 11 (1)ए ,एफ, एच, डी, आय प्राण्यांना कृतीने वागविण्यास प्रतिबंध करणे बाबत अधिनियम 1960, सह कलम 47, 48, 50, 53, जनावरांचे वाहतूक नियम 1978, सह कलम 158/ 177 मोटार वाहन कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच सदर गुन्ह्यामध्ये गोवंश जातीची 35 बैल जनावरे किंमत 9,10,000 रुपये आणि लीलांड कंपनीचा कंटेनर किंमत 25,00000 रुपये असा एकूण 34,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेकनूर पोलीस ठाणेचा तात्पुरता पदभार सपोनी विलास हजारे, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव पोलीस उपनिरीक्षक अनवणे, पोलीस नाईक मारुती कांबळे,पोलीस अमलदार बालासाहेब ढाकणे यांनी केली आहे.