Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात 32 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, तर वीस वर्षीय तरुणीचा पाण्यात बुडुन मृत्यू……!

केज तालुक्यात 32 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, तर वीस वर्षीय तरुणीचा पाण्यात बुडुन मृत्यू……!

केज दि.३१ – घर खर्च व इतर खाजगी कामासाठी हातउसने घेतलेले पैसे कसे फेडायचे ? या विचाराने चिंताग्रस्त झालेल्या ३२ वर्षीय महिलेने घरातील स्लॅबच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जाधवजवळा (ता. केज) येथे घडली. 

                 जाधवजवळा ( ता. केज ) येथील शिवानी अंकुश जाधव ( वय ३२ ) या महिलेने घर खर्च व इतर खाजगी कामासाठी हातउसने पैसे घेतले होते. ते वेळेवर परत करता न आल्याने हे पैसे फेडायचे कसे ? या विचाराने चिंताग्रस्त झालेल्या शिवानी जाधव या महिलेने टोकाची भूमिका घेतली. तिने घरातील स्लॅबच्या हुकाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी ( दि. ३० ) पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, केज ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, फौजदार राजेश पाटील, पोलीस नाईक त्रिंबक सोपणे, दिलीप गित्ते, संतोष गित्ते यांनी घटनास्थळी भेट दिली. 

             उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या महिलेस एक मुलगा असून पती अंकुश जाधव यांच्या खबरेवरून केज पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक त्रिंबक सोपणे हे तपास करताहेत. 

वीस वर्षीय विवाहितेचा पाण्यात बुडून मृत्यू

शेतात जात असताना वाटेत तहान लागल्याने विहिरीवर पाणी पिताना पाय घसरून पडलेल्या २० वर्षीय विवाहितेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना डोणगाव ( ता. केज ) येथे सोमवारी दुपारी २ वाजता घडली.

डोणगाव ( ता. केज ) येथील वैष्णवी लक्ष्मण भुसारे ( वय २० ) ही विवाहित तरुणी आपल्या सासुसोबत सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतात जात होती. वैष्णवी भुसारे हिला वाटेत तहान लागल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या नवनाथ घुले यांच्या शेतातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेली. पाणी पीत असताना पाय घसरल्याने ती विहिरीत पडली. त्यानंतर तिच्या सासूने आरडाओरडा करून नागरिकांना गोळा केले. मात्र तोपर्यंत वैष्णवी भुसारे हिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक दिलीप गित्ते, महादेव बहिरवाल, बाळासाहेब अहंकारे, शमीन पाशा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

 

शेअर करा
Exit mobile version