केज दि.५ – मिक्सर टिप्परने ओव्हरटेक करीत असताना समोरून आलेल्या दुचाकीला धडक देत दुचाकीवरील चार वर्षाच्या बालकास चिरडल्याची घटना चंदनसावरगाव ( ता. केज ) येथे घडली होती. पोलिसांनी टिप्परचा शोध घेतल्यानंतर टिप्पर चालकाविरुद्ध युसुफवडगाव ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कुंबेफळ ( ता. केज ) येथील धनराज रतन पवार, त्यांची पत्नी अंजली पवार, चार वर्षाचा पुतण्या आशिष पवार हे तिघे ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.१० वाजेच्या सुमारास दुचाकीवरून ( एम. एच. ४४ ए. २९१४ ) अंबाजोगाईहुन गावाकडे निघाले होते. त्यांची दुचाकी ही केज – अंबाजोगाई रस्त्यावरील चंदनसावरगाव गावाजवळ आली असता मिक्सर टिप्परने ( एम. एच. १५ एफ. वाय. ५१५६ ) ओव्हरटेक करीत असताना समोरून आलेल्या त्यांच्या दुचाकीला जोराची धडक देत दुचाकीवर खाली पडलेल्या आशिष खंडू पवार या बालकास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. याचवेळी टिप्पर निघून गेल्याने धडक देणाऱ्या वाहनाचा तपास लागला नव्हता. त्यानंतर युसुफवडगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांनी तपासाची चक्रे फिरवून या वाहनाचा तपास लावला. धनराज रतन पवार यांच्या फिर्यादीवरून संबधित टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.