बीड दि.१३ – वीस बावीस दिवसांपुर्वी लग्न झालेल्या एका तरुणाचा मृतदेह त्याच्या बेडरुममध्ये आढळून आला होता. त्यावेळेस त्याच्या सोबत त्याची पत्नी होती. दरम्यान पत्नीनेच बेडरुमबाहेर येऊन नातेवाईकांना पती बेशुद्ध पडल्याचे सांगितले होते. त्यानंतर रुग्णालयात नेल्यानंतर सदरील तरुणाला डॉक्टरने मयत घोषीत केले. ही धक्कादायक घटना 7 नोव्हेंबर रोजी रात्री तालुक्यातील निपाणीजवळका येथे घडली होती. या प्रकरणी नातेवाईकांनी सुनानेच मुलाला मारल्याचा आरोप केला होता. अखेर तपासाअंती गेवराई पोलिसात पत्नी विरोधात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडुरंग राजाभाऊ चव्हाण (वय 22, रा. निपाणीजवळका तांडा) याचे व शितल (रा. पौळाचीवाडी ता. जि. बीड) यांचे दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी पौळाचीवाडी येथे रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. त्यानंतर नवरदेव मुलगा राजाभाऊ मला आवडत नाही, असे म्हणून शितल त्याच्यासोबत सतत भांडण करत असे. दरम्यान दि. 7 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री अकरा ते साडे अकराच्या दरम्यान हे नवदाम्पत्य आपल्या बेडरुममध्ये झोपले असता रात्री साडेअकराच्या दरम्यान शीतल बेडरुम बाहेर येऊन सासू-सासर्याला म्हणू लागली की, पांडुरंग हे गार पडले आहेत, यानंतर नातेवाईकांनी राजाभाऊ याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. तर मयत राजाभाऊ याच्या गळ्याभोवती काही खुना दिसत असल्याने गळा दाबून त्याचा खुन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार सुनेनेच आमच्या मुलाला मारले आहे, असा संशय शितलच्या सासु-सासर्याने व्यक्त केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत सहा दिवसानंतर शितलविरोधात मयत पांडुरंग याची आई निलाबाई राजाभाऊ चव्हाण (वय 45) यांच्या फिर्यादीवरून कलम 302 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साबळे हे करत आहेत. गुन्हा दाखल होताच शितलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.