मुंबई दि.१४ – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याविरोधात 72 तासांच्या आत पोलिसांनी दोन खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोपही ट्वीटच्या माध्यमातून केला आहे. ही लोकशाहीची हत्या असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आपल्याविरोधातील अत्याचाराविरोधात लढा देणार असल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
दरम्यान, आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनही केलं होतं.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचा आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलिसात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यानी मला न्याय द्यावा, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने करण्यात आली आहे.