केज दि.१८ – तालुक्यातील जीवाची वाडी येथील ऊसतोडणीला गेलेले आई आणि लेकरु विहिरीत बुडाल्याची दुर्दैवी घटना उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील मुरूम येथे घडली. चार वर्षाच्या लेकरांला वाचवताना आईला आपल्या जीवाला मुकावे लागले असून बालक व आईचा मृतदेह बचाव पथकांनी काढला आहे.
केज (Kaij) तालुक्यातील जीवाचीवाडी येथील संतोष दशरथ घुले हे आपल्या कुटूंबासह उस्मानाबाद जिल्ह्यात बैलगाडीने ऊसतोड करण्यासाठी गेले आहेत. आज दि.18 शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संतोष घुले यांच्या पत्नी सोनाली संतोष घुले (वय 24) पाणी आणण्यासाठी कारखान्याच्या आवारात असलेल्या पाण्याच्या हौदावर आपल्या 4 वर्षाच्या सोहम या बालकासह गेल्या होत्या. यावेळी शेजारी असलेल्या डबक्यात सोहमचा पाय घसरला. यावेळी त्याला वाचवण्यासाठी सोनाली याही डबक्यात गेल्या असता पाण्यात दोघेही बुडाले.
दरम्यान, आपल्या लेकराला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईला आपला जीव गमवावा लागला. सदर ठिकाणी विहिर असल्याचे सांगण्यात आले. गावचे सरपंच व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.