केज दि.२३ – तालुक्यातील लाडेगाव येथील रहिवासी विशाल पांडुरंग मुळे हा लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून राज्यात तिसरा तर विक्रीकर निरीक्षक म्हणून पाचवा आला आहे.त्याच्या या यशामुळे तालुक्याची मान उंचावली असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
तालुक्यातील गांजी येथील प्राथमिक शाळेत विशाल चे वडील पांडुरंग मुळे हे तर आई चंदन सावरगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विशाल याने पुणे विद्यापिठातून बी. ई. मेकॅनिकल ची पदवी प्राप्त केलेली आहे. तर त्याचे प्राथमिक शिक्षण हे तालुक्यातील पिसेगाव येथे तर माध्यमिक शिक्षण नेवासा येथे पूर्ण झालेले आहे. सुरुवातीपासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत विशाल स्पर्धा परिक्षेकडे वळला.राज्यसेवेचा अभ्यास करत त्याने लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तो खुल्या प्रवर्गातून यशस्वी झाला. मात्र एवढ्यावरच तो थांबणार नसून येत्या जानेवारी मध्ये होणाऱ्या राज्यसेवेचा मुख्य परीक्षेसाठी तो पात्र झालेला आहे.
दरम्यान सदरील यशामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून केज तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.