केज दि.३० – येथील उपजिल्हा रुग्णालयात सेवक पदावर कार्यरत असलेल्या प्रकाश राऊत ( वय ५६ ) यांनी मुलीच्या नांदत्या गावी डिघोळअंबा ( ता. अंबाजोगाई ) येथे आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
केज तालुक्यातील भाटुंबा येथील प्रकाश शिवदास राऊत ( वय ५६ ) हे केजच्या उपजिल्हा रुग्णालयात सेवक पदावर कार्यरत होते. ते २९ नोव्हेंबर रोजी त्यांच्या मुलीच्या नांदत्या गावी डिघोळअंबा ( ता. अंबाजोगाई ) येथे मुक्कामी गेले होते. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता झोपेतून उठून बाथरूमला जाऊन येतो असे सांगून प्रकाश राऊत हे शेतात गेले. शेतातील आंब्याच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव ठाण्याचे प्रमुख सपोनि डॉ. संदीप दहिफळे यांच्या आदेशावरून जमादार सीताराम डोंगरे, भगवान खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून प्रकाश राऊत हे नेहमी विचारात असायचे, त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी माहिती त्यांचा मुलगा अशोक राऊत याने पोलिसांना दिली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार सीताराम डोंगरे हे करत आहेत.