उस्मानाबाद दि.१ – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी उस्मानाबादेत आज धडक मोहीम राबवली. उस्मानाबाद शासकीय रुग्णालयास भेट देत पंचनामा केला. गुरुवारी दुपारी भारती पवार शासकीय रुग्णालयात पोहोचल्या. औषधांची चिट्ठी हातात घेऊन रांगेत उभ्या राहिल्या. खिडकीजवळ गेल्यावर त्यांना धक्कादायक उत्तर ऐकायला मिळालं. ते ऐकून त्या कर्मचाऱ्यावर चांगल्याच भडकल्या. सामान्य नागरिकांनी हे उत्तर अनेकदा ऐकलंय. त्याविरोधात तक्रारही केली होती. आता केंद्रीय मंत्र्याच्या धडक दौऱ्यातही हेच उत्तर ऐकायला मिळालं. काही औषधे उपलब्ध नसल्याने खासगी दुकानातून खरेदी करण्याचा सल्ला कर्मचारी रुग्णांना देत होते. त्यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पवार यांनी त्यांना जाब विचारला.
भारती यांनी स्वतः रुग्णाची चिट्ठी हातात घेऊन रांगेत औषधे घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेल्यावर हा प्रकार समोर आला. केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी रुग्णालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांना चांगलंच झापलं.अनेक औषधे उपलब्ध नसल्याच्या नागरिकांनी केंद्रीय आरोग्यमंत्री पवार यांच्याकडे तक्रारी केल्या. उस्मानाबाद हा आकांक्षित जिल्हा असून या जिल्ह्यात विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री पवार उस्मानाबाद येथे आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकांक्षित जिल्ह्याचा खास आढावा व लक्ष देण्याची जबाबदारी मंत्री पवार यांच्यावर दिली आहे. पवार यांनी जागतिक एड्स दिनानिमित्त रॅलीस हिरवा झेंडा दाखवला त्यानंतर मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलची पाहणी केली.