केज दि.३ – केज शहरांतर्गत उमरी रस्त्याला निधी मंजूर झाल्यानंतर निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणे बाकी असताना व नोव्हेंबर अखेर काम सुरू करण्याचे लेखी देऊनही नगरपंचायत वेळ काढुपणा करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे उमरी रस्त्यासाठी संघर्ष करणाऱ्या आंदोलकांच्या हाती पुन्हा घंटा येण्याची चिन्ह आहेत.
केज नगरपंचायतने यासाठी नोव्हेंबर अखेरची मुदत मागितली होती.समितीने विश्वास ठेवून मुदत वाढवून आंदोलन स्थगित केले होते. मात्र मुदत संपून डिसेंबर उजाडला तरी अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता समितीने यासाठी आपले स्थगित घंटा/थाळीनाद आंदोलन सोमवार दि.५ डिसेंबर पासून बेमुदत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरील रस्ता व्हावा यासाठी यापूर्वी ही कित्येकदा आंदोलने झालेली आहेत.मात्र प्रश्न मार्गी लागलेला नाही.आणि पुन्हा निधी मंजूर होऊनही तीच वेळ आल्याने सदरील प्रभागातील रहिवासी संभ्रमात पडले आहेत.
दरम्यान, उमरी रस्त्यावरून वागणारे व केज शहरातील इतर युवक-नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केज विकास संघर्ष समितीचे समन्वयक हनुमंत भोसले यांनी केले आहे. तसेच केज नगरपंचायत व केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनीही सदरील जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने काम तात्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.