केज दि.१० – रस्त्याच्या दुरुस्तीसाठी टाकलेल्या कचखडीवर दुचाकी गेल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना केज – अंबाजोगाई रस्त्यावरील युसुफवडगाव शिवारात घडली.
केज शहरातील रोजा मोहल्ला भागातील आयुब मेनोद्दीन शेख यांचे कुटुंब सध्या आनंदगाव ( सा. ) येथील येडेश्वरी साखर कारखाना परिसरात वास्तव्यास आहे. त्यांचा मुलगा महमंद गौस आयुब शेख ( वय १८ ) हा २८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता दुचाकीवर ( एम. एच. ४४ ई ६९३२ ) बसून पाणी आणण्यासाठी गेला होता. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणलेली कचखडी रस्त्याच्या कडेला टाकली होती. त्या खडीवर त्याची दुचाकी गेल्याने दुचाकीवरून खाली पडल्याने महमंद गौस आयुब शेख हा डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला होता. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. आयुब शेख यांच्या खबरेवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.