शैक्षणिक सहल घेऊन जाणारी बस आणि अन्य एका वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 22 जण जखमी झाले असून यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्वांवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकाच दिवशी दोन ठिकाणी शैक्षणिक सहलीच्या वाहनांना अपघात झाल्याने पालक चिंतेत आहेत.
गंगाखेड येथील संत जनाबाई विद्यालयाची शैक्षणिक सहल घेऊन जाणारी स्कूल बस चाकूरकडे जात होती. याच वेळी अहमदपूर येथून बुलढाण्याकडे जाणारी बस गंगाखेड-राणीसावरगाव रस्त्यावरील खंडाळी पाटीवर आली असता दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. ज्यात दोन्ही बसमधील 22 जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती कळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना बाहेर काढून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
जिथे त्यांच्यावर उपचार केले जात आहे. अपघातग्रस्त बसमधील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 10 ते 15 वर्षाचे 3 विद्यार्थी जखमी आहेत. नेमका अपघात कुणाच्या चुकीने झाला हे मात्र अद्याप कळले नसून घटनेचा तपास पिंपळदरी पोलीस करत आहेत.
तर दुसरा अपघात मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर झाला. या अपघातामध्ये दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर 20 हून अधिक विद्यार्थी जखमी झालेत. एकूण 48 विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईतील खासगी क्लासची पिकनिक निघाली होती. या पिकनिकदरम्यान, संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. पुणे मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील खोपोली जवळ बोरघाटात ही बस उलटली. या अपघातात हितीका खन्ना नावाची एक 16 वर्षांची विद्यार्थीनी तर राजेश म्हात्रे नावाचा 16 वर्षांचा विद्यार्थी मृत्युमुखी पडलाय.
दरम्यान, सातत्याने विद्यार्थी सहलीच्या वाहनांना अपघात होत असल्याने चिंतेची बाब आहे.त्यामुळे संबंधित वाहन व्यवस्थापनाने काळजी घेणे गरजेचे असून नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच सहली काढाव्यात अशी पालक मागणी करत आहेत.