केज दि.१३ – जिल्हा परिषद शाळेच्या समोर चक्क देशी दारू विक्री करणाऱ्या इसमास
डिघोळअंबा ( ता. अंबाजोगाई ) येथून युसुफवडगाव पोलिसांनी छापा मारून पकडले. त्याच्याकडील ४२०० रुपयांच्या देशी दारूच्या ६० बाटल्या जप्त केल्या असून त्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
डिघोळअंबा ( ता. अंबाजोगाई ) येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोर रस्त्याच्या कडेला संतोष बाबुराव बोंदर हा देशी दारूची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांना मिळताच फौजदार रियाजोद्दीन शेख, जमादार सीताराम डोंगरे, रावसाहेब मुंढे, पोलीस शिपाई योगेश समुद्रे यांचे पथक पाठवून दिले. पथकाने ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी अचानक छापा मारून संतोष बोंदर यास देशी दारू विक्री करीत असताना रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातील ४ हजार २०० रुपयांच्या देशी दारूच्या ६० बाटल्या जप्त केल्या. जमादार रावसाहेब मुंढे यांच्या फिर्यादीवरून संतोष बोंदर याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.