गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळा ३ ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ओबीसी कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मात्र राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विजय वडेट्टीवारांच्या या वक्तव्याचं खंडन केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली होती.
सद्यस्थिती बघता ३ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यापूर्वी सर्व शाळा सॅनिटायझ करून घ्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. वडेट्टीवारांनी ३ ऑगस्ट पासून शाळा सुरु होण्याबाबत केलेलं विधान हे त्यांच्या पुरते आणि चंद्रपूरच्या परिस्थितीबाबत असू शकत यात दुमत नाही, मात्र अद्याप शासनाचा असा कुठलाही विचार नसल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
उलट काही खासगी शाळांकडून पालकांना होत असलेल्या जाचामुळें ऑनलाईन शिक्षण पद्धतीसुद्धा बंद करण्याचं आपलं मत असल्याचं त्यांनी सांगितले. खाजगी शाळांनी पालकांना त्रास दिल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.