Site icon सक्रिय न्यूज

जेंव्हा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हातात घेतात खडू अन डस्टर…..!

जेंव्हा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हातात घेतात खडू अन डस्टर…..!
मराठवाड्यातील शिक्षकांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेणारे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर गुरुवारी (15 डिसेंबर) नव्या भूमिकेत दिसले. हिंगोलीतील जिल्हा परिषदेत शाळेत सुनील केंद्रेकर यांनी चक्क गणिताचा तास घेतला.
           विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी काल अचानक औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर गावाला भेट दिली. गावाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्रेकर यांनी थेट जिल्हा परिषद शाळा (Zilla Parishad School) गाठली. इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेश करताच आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हातात खडू आणि डस्टर घेत विद्यार्थ्यांना गणिताचे धडे शिकवायला सुरुवात केली. संख्यांचे वर्ग, वर्गमूळ त्याचबरोबर घन आणि घनमूळ हे सगळं विभागीय आयुक्तांनी विद्यार्थ्यांना शिकवले. विभागीय आयुक्त शिक्षक बनवून शिकवत आहेत याची नीटशी कल्पनाही नसल्याने विद्यार्थ्यांनी सुद्धा मनमोकळा संवाद साधला. यामुळे सुनील केंद्रेकर यांनी समाधान व्यक्त केले तर या वर्गाचे वर्गशिक्षक असलेले अशोक इंगोले यांची सुद्धा केंद्रेकर यांनी स्तुती केली. आपण चांगले शिकवत आहात. परंतु विद्यार्थ्यांकडून 300 पर्यंतचे पाढे पाठ करुन घ्या, अशा सूचना सुद्धा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वर्गशिक्षक अशोक इंगोले यांना दिल्या.
                 दरम्यान, मराठवाड्यातील जिल्हा परिषदेतील पहिली ते दहावीला शिकवणाऱ्या जवळपास 10 हजार शाळामधील 35 हजारांच्या  शिक्षक आणि पहिली ते दहावी संस्थातील शाळांमधील शिक्षकांना परीक्षा द्यावी लागणार आहे. शाळेतील गुणवत्तेबाबत दुरावस्था पाहून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी हा निर्णय औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्यानंतर तिथली गुणवत्ता पाहून शिक्षक आणि अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. शिक्षणाचा दर्जाबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी झापले, तो एक ऑडिओ व्हायरल झाली होती. त्यानंतर आता शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी विभागीय सुनील केंद्रेकरांनीच एक पाऊल टाकत आता शिक्षकांची परीक्षा घेण्याचे ठरवलं आहे.
शेअर करा
Exit mobile version