मुंबई दि.२१ – महाराष्ट्र सरकार आता कोरोना नमुन्यांच्या जीनोम सीक्वेन्सिंग करणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. जगभरातील वाढता कोरोना संसर्ग पाहता केंद्रांना राज्यांना जीनोम सीक्वेंसिंग करण्याच्या मार्गदर्शन सूचना केल्या होत्या. या सूचना गांभीर्याने घेत राज्य सरकारने नमुन्यांचं जीनोम सीक्वेन्सिंग करण्याचा निर्णय घेतला असून नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
एकीकडे जगभरात कोरोना रुग्णांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दुसरीकडे भारतातील कोरोनाची परिस्थिती सामान्य आहे. असं असलं तरी भारत सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जीनोम सीक्वेन्सिंगबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी संजय खंदारे यांनी सांगितलं आहे की, ‘केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार, राज्यातील कोरोना रुग्णांचे सर्व नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी मुंबई आणि पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवणार आहेत.
जगभराचं टेन्शन वाढवणाऱ्या कोरोनामुळे भारत सरकारने खबरदारीचे उपाय करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज कोरोना संदर्भात महत्त्वाची बैठक बोलावली होती. यामध्ये देशातील आणि जगातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.जगभरात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकेदुखी वाढवली आहे. गेल्या आठवड्यात जगात 36 लाख नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. चीनमध्ये कोरोनाचं संकट फार गंभीर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दररोज अनेक जणांचा मृत्यू होत असून मृतदेहांचा खच पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला असून औषधे आणि खाटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली केली.