Site icon सक्रिय न्यूज

शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्या – बाळासाहेब ठोंबरे

शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्या – बाळासाहेब ठोंबरे
केज दि.२५ – दरवर्षी शेतकऱ्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारचे संकट ओढवलेले आहे. मग कधी दुष्काळ असेल तर कधी ओला दुष्काळ. शेतामध्ये पेरलेले हाताला लागत नाही आणि हाता तोंडाशी आलेला घास हा कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे हिरावला जातोय. यावर्षी अशाच प्रकारची बाब समोर आलेली आहे.पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पीक विमा ही भरला. पिक विमा भरल्यानंतर शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मिळणे गरजेचे होते. परंतु तसे न होता केज तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीकडे तक्रारी केल्या त्याच शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला आहे.
                उर्वरित शेतकऱ्यावर मोठा अन्याय असून काही शेतकरी पिक विमा कंपनीकडे तक्रारी करू शकत नाहीत. याचा अर्थ त्यांचे नुकसान झाले नाही असे होत नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या त्यांनाच जर पीक विम्याचे अनुदान द्यायचे असेल तर ही प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या नाहीत अशाही सर्व शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा तात्काळ मंजूर करावा व त्याचे वितरण ही तात्काळ करावे. अशी मागणी केज तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
          दरम्यान, चालू वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटात सापडलेला आहे. आणि जर प्रशासनाकडून अशी आवडा निवड होत असेल तर शेतकऱ्यांनी कुणाकडे पहायचे ? आणि दाद कुणाकडे मागायची ? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे.
शेअर करा
Exit mobile version