केज दि.२८ – तालुक्यातील साळेगाव येथे एक विचित्र घटना घडली आहे. गावातीलच दोघे एका चिकन सेंटरवर गेले असता त्या ठिकाणी कोंबडीचे पाय तोडण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यवसन भांडणामध्ये झाले. आणि एकाने दुसऱ्याच्या डोक्यामध्ये सतुर घालून जखमी केल्याची घटना घडली आहे.
केज तालुक्यातील साळेगाव येथे दिगंबर मारुती राऊत व अशोक सुरेश राऊत हे दोघेजण गावातीलच एका चिकन सेंटरवर गेले. त्या ठिकाणी सदरील दुकानाचा मालक नव्हता, म्हणून अशोक सुरेश राऊत हा स्वतः कोंबडीचे पाय तोडू लागला. मात्र दिगंबर राऊत यांनी त्यास तू कोंबडीचे पाय तोडू नको मालक येऊ दे असे म्हणताच दोघांमध्ये बाचाबाची झाली, आणि भांडण एवढ्यावरच न थांबता अशोक राऊत यांने दिगंबर राऊत यांच्या डोक्यामध्ये कोंबडीचे पाय तोडण्याचा सत्तुर घालून जखमी केल्याची घटना दिनांक २७ डिसेंबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजता घडली.
दरम्यान, भांडण कोणत्या कारणावरून होईल याचा कांही नेम राहिला नसून दिगंबर राऊत याच्या फिर्यादीवरून अशोक राऊत विरुद्ध केज पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.