मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच कारणामुळे भारतातही प्रतिबंधात्मक उपायांद्वारे म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. लसपुरवठा तसेच आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, करोना संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येथे शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. बुधवारी (२८ डिसेंबर) याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार शाळा तसेच महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोबतच विद्यार्थ्यांनी करोना प्रतिबंधक नियम पाळावेत असेही आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच पब्स, विमातळ, उपहारगृहे या ठिकाणीदेखील मास्क वापरणे तसेच इतर प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. कलबुर्गी विमानतळ प्रशासनाने याआधीच मास्क वापरणे अनिवार्य असल्याचे आदेश दिलेला आहे.
संभाव्य करोना लाटेला तोंड देण्यासाठी काय तयारी असावी यावर चर्चा करण्यासाठी कर्नाटक सरकारने एक बैठक घेतली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्यमंत्री के सुधाकर होते. सोबतच या बैठकीला महसूलमंत्री आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आर अशोका हेदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर मास्क वारणे अनिवार्य असल्याचा निर्णय घेण्यात आला.