बीड दि.३ – एका शेतकऱ्याने सोशल मीडियावर लाइव्ह येत “आता सर्व संपलं…” असे म्हणत विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. गेवराई तालुक्यातील मालेगाव येथील नारायण वाघमोडे असे विष घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
नारायण वाघमोडे यांच्या शेतात सिंगल फेजची डीपी आहे. या डीपीची वीज कट केल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्याची विनंती त्यांनी केली होती. परंतु महावितरण कर्मचाऱ्याने काही ऐकले नाही. त्यामुळं 24 डिसेंबर रोजी नारायण वाघमोडे यांनी सोशल मीडियावर लाईव्ह करत कीटकनाशक प्राशन केले होते.हा लाइव्ह व्हिडिओ पाहत काही तरुणांनी घटनास्थळी जात वाघमोडे यांना गेवराई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांच्यावर गेवराईत प्राथमिक उपचार करून बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. आणि आता त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, वाघमोडे यांच्यासह आठ शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले होते. मात्र वाघमोडे यांनी विष घेतल्याचे कळताच महावितरणकडून वीजेचे कनेक्शन त्याच दिवशी पुन्हा जोडले गेले. दरम्यान या घटनेने बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून महावितरणच्या दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केलीय.