केज दि.५ – नियुक्त केलेल्या पथकाने केलेल्या चौकशीत दोषी आढळून आल्याने लहुरी येथील ग्रामसेवक धनंजय आबाराव खामकर यांना सेवेतून निलंबित केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी ही कारवाई केली.
लव्हरी येथील पंडित वसंतराव चाळक यांनी तक्रार केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. चौकशी अहवालानुसार वरिष्ठांचे आदेशाचे पालन न करणे, ग्रामपंचायतच्या व स्वतःच्या नावावर २ लाख ४० हजार रुपये उचलून लेखासंहिता २०११ च्या तरतुदीचे उल्लंघन करून अनियमितता केल्याचे दिसून आले. कामातील निधीपेक्षा जास्तीचा खर्च दर्शवून अनियमितता केल्याचा ठपका या अहवालात होता. व्यायामशाळा बांधकामाच्या अंदाजपत्रकात नोंदविलेल्या मोजमाप पुस्तिकेत व प्रत्यक्ष चटई क्षेत्रात तफावत असल्याचे दिसून आले. कनिष्ठ अभियंता व उपअभियंता हे केज तालुक्यात कार्यरत नसतानासुद्धा मोजमाप पुस्तिका व मूल्यांकन प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केल्याचे दिसून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी एका आदेशाद्वारे ग्रामसेवक धनंजय आबाराव खामकर यांना जि. प. सेवेतून निलंबित केल्याने खळबळ उडाली आहे.