Site icon सक्रिय न्यूज

दहावी – बारावी तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर…..!

दहावी – बारावी तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर…..!

फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा 1 ते 20 फेब्रुवारी, तर दहावीच्या या परीक्षा 10 फेब्रुवारी ते 1 मार्च यादरम्यान होणार आहेत.

                   शाळेतील विद्यार्थी संख्या लक्षात घेता वेळापत्रकानुसार प्रात्यक्षिक परीक्षा घेणे शक्य झाले नाही तर विद्यार्थी संख्या आणि प्रयोगशाळा क्षमतेनुसार विभागीय मंडळ स्तरावर प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी ठरवून परीक्षा घेण्यात याव्यात, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिल्या आहेत.मंडळाने दिलेल्या कालावधीत परीक्षा घेता न आल्यास प्रात्यक्षिक, तोंडी विषयांच्या परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापन आऊट ऑफ टर्न परीक्षा पद्धतीने घेण्यात येणार आहेत. बारावीची आऊट ऑफ टर्न परीक्षा 23 ते 25 मार्च आणि दहावीची 27 ते 29 मार्च या कालावधीत पार पडणार आहेत. तसेच दहावीतील दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयाची लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 27 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत होणार आहेत.

             दरम्यान, परीक्षेच्या काळात कॉपीसारख्या गैरप्रकार टाळण्यासाठी बैठे पथक विशिष्ट शाळेत पेपरच्या संपूर्ण वेळेत बसून राहणार आहे. बैठे पथकात कमीत कमी चार सदस्य असतील. त्यातील दोन सदस्य प्रत्येक परीक्षा ब्लॉकमधून फेरी मारतील, दोन सदस्य परीक्षा केंद्राच्या आवारात लक्ष ठेवतील. परीक्षा दालनात गैरप्रकार निदर्शनास आल्यास पथकाने त्याची नोंद घेऊन केंद्र संचालकाच्या निदर्शनास आणावी. तसेच आवश्यक त्या सूचना पोलिसांना देण्यात येतील. परीक्षा केंद्राच्या बाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

                   अनेकदा परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉपी पुरवल्या जातात. यात सर्वात मोठा वाटा झेरॉक्स केंद्रचालकांचा असतो. या सेंटरवर प्रश्नांच्या उत्तरांची झेरॉक्स कॉपी करून मुलांना पुरवली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहेत. यंदा परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात परीक्षेच्या वेळी सुरू राहणाऱ्या झेरॉक्स सेंटरवर बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच झेरॉक्स सेंटर उघडे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेअर करा
Exit mobile version