Site icon सक्रिय न्यूज

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रा.किरण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल…..!

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रा.किरण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल…..!
औरंगाबाद दि.१२ – मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे भाजप व शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा.किरण पाटील यांचा उमेदवारी अर्ज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.
          मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप तसेच शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा.किरण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.यावेळी क्रांती चौक ते विभागीय कार्यालया पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीयमंत्री भागवत कराड, कॅबिनेट मंत्री अतुल सावे, जेष्ठ नेते हरिभाऊ बागडे, जेष्ठ नेते राणा जगजितसिंह पाटील, पालकमंत्री संदीपान भुमरे, खासदार प्रतापराव चिखलीकर, संभाजी पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर, भगवानराव साळुंके, आमदार सुरेश धस, अक्षय मुंदडा,सुरेश पठाडे बहुसंख्य आजी माजी आमदार, खासदार तसेच सर्व भाजपचे जिल्हाध्यक्ष यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तर अर्ज दाखल करण्यापूर्वी मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

                       यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाषणाच्या सुरुवातीला प्रचंड घोषणा देत भाषणाला सुरुवात केली.किरण पाटील यांच्या उमेदवारीमुळे ऊर्जा निर्माण झाली आहे. शिक्षकांच्या समस्यांची जाण किरण पाटील यांना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयातून उमेदवारी देण्यात आली आहे.तर शिक्षक बांधवांची दिवाळी आझाद मैदानावर घालवली अशा मविआ च्या असंवेदनशील नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे असा प्रहार केला. येत्या तीन वर्षांत सर्व शाळा शंभर टक्के अनुदानित करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. अजित पवार मंत्री असताना विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या मुदत वाढीला विरोध केल्याने विकास खुंटला.मागचे सरकार केवळ फेसबुक लाईव्ह होते. तसेच बावनकुळे यांनी किरण पाटील यांना जवळ घेऊन शिक्षकांच्या प्रश्नावर मी स्वतः एक बैठक लावून प्रश्न मार्गी लावणार असल्याचा विश्वास दिला. त्यामुळे उपस्थित शिक्षक कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

                 मंत्री भागवत कराड, अतुल सावे, राणा जगजितसिंह पाटील, संदीपान भुमरे यांनीही किरण पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार आपल्या भाषणातून व्यक्त केला.राज्यातील सर्व प्रश्न सोडवण्याचे काम या सरकारने केले आहे.केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी किरण पाटील हे शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेला उमेदवार आहे.आपल्या सर्वांच्या विश्वासावर किरण पाटील यांची उमेदवारी दिली आहे.त्यामुळे आम्ही ही जागा नक्कीच निवडून आणणार असल्याची खात्री दिली.

                दरम्यान, आज संपूर्ण मराठवाड्यातून शिक्षक व भाजपचे कार्यकर्ते आल्याने औरंगाबाद भगवेमय झाले होते.तर सभेच्या ठिकाणी प्रचंड जनसागर लोटल्याने मैदान अपुरे पडले होते.त्यामुळे अर्ज दाखल करण्याचा दिवशीच किरण पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

शेअर करा
Exit mobile version