औरंगाबाद दि.२५ – जुनी पेन्शन योजना बंद करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीला जुन्या पेन्शन योजने बाबत बोलण्याचा अधिकार नसून तो प्रश्न सोडवण्याची धमक आमच्यातच आहे. लवकरच त्यावर मार्ग काढणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपा तसेच शिक्षक परिषदेचे मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक किरण पाटील यांच्या प्रचारार्थ औरंगाबाद येथील संत एकनाथ रंग मंदिरामध्ये भव्य शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाला अवघे चार दिवस उरले असल्याने प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मागच्या चार दिवसांपूर्वी प्रा.किरण पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी अक्खा मराठवाडा पिंजून काढला आहे.तर बुधवारी दि.२५ रोजी औरंगाबाद येथे संत एकनाथ रंग मंदिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावल्याने बीजेपी उमेदवार प्रा.किरण पाटील यांनी मराठवाड्यात आघाडी घेतली आहे. व्यासपीठावर केंद्रीयमंत्री भागवत कराड, जेष्ठ नेते हरिभाऊ बागडे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, मंत्री अब्दुल सत्तार, माजीमंत्री बबनराव लोणीकर, आमदार राणा जगजितसिंह, संजय शिरसाट, प्रशांत बंब, नारायण कुचे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिक्षक मेळाव्यामध्ये काय बोलणार याकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागलेले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना प्राध्यापक किरण पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे सांगत यापुढे विधान परिषदेमध्ये येऊन प्राध्यापक किरण पाटील हे शिक्षकांचे प्रश्न सोडवतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच या शिक्षक मतदार संघात सर्वांचा पाठिंबा घेऊन किरण पाटील उभे आहेत, सर्व प्रश्नांची त्यांना जाण आहे म्हणून आम्ही त्यांची निवड केली. ते आपल्या अपेक्षा पूर्ण करतील. तसेच देशातले सर्व प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादी च्या सरकारने निर्माण केले ते आम्ही सोडवत आहोत. कोर्टाने सांगूनही त्या सरकारने अनुदान दिले नाही. केवळ आश्वासने दिली. किरण पाटील यांना मी केसरकर यांच्याकडे पाठवून अनुदानाचा प्रश्न सोडवला. पुरवणी मागण्यात 1160 कोटींची तरतूद केली आहे. जीआर काढायच्या वेळेला निवडणूक लागली त्यामुळे जीआर निश्चित काढणार आहोत. पोपटांना सांगा सर्व प्रश्न आम्हीच सोडवणार आहोत. मागण्या करून उपयोग नाही ती मागणी मंजूर झाली पाहिजे. मागण्या मान्य करून घेणारे प्रतिनिधी पाहिजेत. 2005 साली काँग्रेस राष्ट्रवादीनेच जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन लावली. जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे पाप त्यांचे आहे. जुनी पेन्शन आणायची असेल तर वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. आम्ही जुन्या पेन्शन बाबत नकारात्मक नाहीत, सर्व विभागांशी चर्चा करून ती देण्याची धमक आमच्यातच आहे. वित्त विभागाशी चर्चा करून मार्ग काढणार आहोत.प्रा. किरण पाटील हे जाण असलेले नेतृत्व आहे. आमच्या डोक्यावर बसून ते काम करून घेतील असे विस्तारित भाषण त्यांनी केले.
तर यावेळी केंद्रीयमंत्री भागवत कराड यांनी मन लावून काम केल्यास आपण निश्चित विजयी होऊ, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी किरण पाटील यांना निवडणूक दिले पाहिजे असे आवाहन शिक्षकांना केले.
मंत्री अब्दुल सत्तार यांनीही आपले विचार व्यक्त केले. ते बोलताना म्हणाले की, किरण पाटील आपले जावई आहेत त्यामुळे आपल्यावर दुहेरी जबाबदारी आहे. राज्याची तिजोरी फडणवीस साहेबांच्या हातात आहे. हजारो शिक्षकांचा प्रश्न या सरकारने मिटवला आहे. या निवडणुकीत चांगला उमेदवार दिला आहे त्यामुळे शिवसेनेने जास्त काम केले पाहिजे. किरण पाटील ऐतिहासिक मतांनी निवडून येतील अशी ग्वाहीही सत्तार यांनी दिली.
आमदार राणा जगजितसिंह यांनी मराठवाड्यातील शिक्षकांना आता बदल हवा असून तो बदल निश्चित होणार असल्याचे सांगितले.
तर उमेदवार किरण पाटील यांनी बोलताना महाराष्ट्राचे भविष्य देवेंद्र फडणवीस असल्याचे सांगत या सरकारमुळे महाराष्ट्राला वैभव निर्माण झाले असल्याचे म्हटले. विनाअनुदानित चा कलंक आपण व या सरकारने मिटवला असून माझ्या विनंतीमुळे आपण केसरकर साहेबांना बोलून प्रश्न मिटवण्यास 1160 कोटींची मदत केली. जुन्या पेन्शन चा प्रश्न मोठा आहे त्यावरही आपण मार्ग काढण्यास सुरुवात केली आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकीत मी परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
सदरील मेळाव्यासाठी मराठवाड्यातून हजारो शिक्षकांनी उपस्थिती लावली होती.