केज दि.२७ – पाणी भरण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एकास चाकू व गजाने मारहाण करीत जखमी केले. तर दोन महिलांना ही लाथाबुक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना दरडवाडी ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
दरडवाडी ( ता. केज ) येथील श्रीमंत सुधाकर दराडे यांची पत्नी मीनाक्षी व आई सीताबाई या दोघी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शेतातून शेळ्या घेऊन घरी आली. त्यांनी शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी सार्वजनिक बोअर सुरू करण्यास सांगितल्यावरून श्रीमंत दराडे हे बोअर सुरू करण्यास गेले असता त्यांना विरोध करीत अंगद शामराव दराडे याने कॉक बंद केला. तर शामराव भिमराव दराडे याने गज डोळ्यावर मारून दुखापत केली. त्याचा भाऊ रामराव भिमराव दराडे याने लाथाबुक्याने मारहाण करून पाठीवर काठी मारली. द्वारका शामराव दराडे हिने चाकू आणून तिचा मुलगा अंगद शामराव दराडे याच्याकडे दिला. त्याने कानावर व कानाचे पाठीमागे चाकु मारून जखमी केले. श्रीमंत दराडे यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून आलेल्या त्यांच्या आई सीताबाई यांना रामराव दराडे याने उचलुन आपटले. तर द्वारका दराडे हिने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर दुखापत केली. भागाबाई दराडे हिने त्यांची पत्नी मीनाक्षी हिच्या केसाला धरून लाथाबुक्याने मारहाण केली. तर त्यांचे वडील सुधाकर दराडे यांना लक्ष्मण दराडे याने लाथाबुक्याने मारहाण केली. अशी फिर्याद श्रीमंत दराडे यांनी दिल्यावरून अंगद दराडे, शामराव दराडे, द्वारका दराडे, भागाबाई दराडे, लक्ष्मण दराडे या पाच जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
धोतरा येथे दाम्पत्यास मारहाण ; चौंघांवर गुन्हा
तर आमच्या दोन काकऱ्या का पेरल्या असे म्हणत एका दाम्पत्यासह मुलास चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना धोतरा ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
धोतरा ( ता. केज ) येथील आशाबाई भागवत गीते ही महिला २५ जानेवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शेतातील घेवडा हे पीक काढीत असताना तिचा दीर आश्रुबा देविदास गिते व त्याचा मेव्हणा नवनाथ बाबुराव तांदळे या दोघांनी आश्रुबाचे शेत दोरीने मोजले. त्यानंतर तुझ्याकडे दोन काकऱ्या शेत जास्त येत आहे, तु का पेरलेस असे म्हणुन शिवीगाळ करून तोंडावर बुक्की मारून मुक्कामार दिला. महिलेने घरी येऊन घडलेला प्रकार सांगत असताना दादासाहेब आश्रुबा गिते, संगिता आश्रुबा गिते, संतोष आश्रुबा गिते, आश्रुबा देविदास गिते यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली. तर भागवत गीते यांना दादासाहेब गिते याने काठीने डोळे, कपाळ, हाताच्या बोटावर मारून दुखापत केली. लाथा मारून मुक्कामार दिला. त्यांचा मुलगा अक्षय गिते हा भांडणे सोडवण्यासाठी आला असता त्याला ही लाथाबुक्याने मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद आशाबाई गीते यांनी दिल्यावरून दादासाहेब गीते, संगीता गीते, संतोष गीते, आश्रुबा गीते या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.