केज दि. ३१ – केज शहर हे मध्यवर्ती ठिकाणी असून दोन राष्ट्रीय महामार्गावर आहे. मात्र शहराचा विकास बाजूला ठेवून आपण दोघे भाऊ वाटून खाऊ असे राजकारण सुरू आहे. तर गायरान, देवस्थान, दर्ग्याच्या जमिनी हडप करून त्यावर संस्था, शाळा, घरे उभारली आहेत. असा आरोप करीत या भू – माफियांच्या विरोधात लवकरच रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केज येथील शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे हे बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, मागील दहा वर्षांपासून बीड जिल्ह्यात माफियाराज सुरू आहे. या माफियाराज विरोधात लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे व आपण लढा दिला होता. तर लोकप्रतिनिधी हे जनतेच्या हिताचे कामे करण्याऐवजी स्वतःच्या हितासाठी काम करीत आहेत. केज शहरात ही भू – माफियाचे प्रस्थ वाढले आहे. याकडे कुणाचे लक्ष नसून गायरान जमिनी, मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनी हडप करून शाळा, संस्था, घरे उभारली आहेत. असा आरोप करीत त्यांनी या भु माफियांपासून केज शहर वाचणार कसे ? असा प्रश्न उपस्थित करुन केज वाचले पाहिजे. त्यासाठी पत्रकारांनी जागृती करावी. अशी अपेक्षा ही व्यक्त केली. भु माफिया सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला असून मंदिर, देवस्थान, दर्ग्याच्या जागा घेतल्या आहेत. कुठलाच पक्ष रंजल्या गंजल्यासाठी जवळचा नसून हे सर्व एक आहेत. सत्तेच्या मलिद्यासाठी यांचे भांडण असून सगळे लबाडचे राजकारण आहे. राजकीय पुढाऱ्यांनी माफियागिरी सुरू केली असल्याचा आरोप करीत केज येथील गायरान, देवस्थान, इनामी जमिनी वाचविण्याचे काम कोण करणार ? असा प्रश्न आहे. मात्र त्यासाठी बहुजन विकास मोर्चा लवकरच रस्त्यावर उतरणार असल्याचे पोटभरे यांनी सांगितले.