परतूर दि.१६ – आष्टी येथे अवैध वाळू ची बातमी का छापली म्हणून आनंदगांव येथील वाळू माफीयाने आष्टी येथील पत्रकार व त्यांच्या भावावर दांडक्याने हल्ला केल्याची घटना घडली. आष्टी पोलीसांनी मात्र थातूर मातूर कारवाई करत वाळू माफीयाला एक प्रकारे आधार देण्याचे काम केल्याने बुधवारी पत्रकारांनी या घटनेचा निषेध केला आहे. हल्लेखोर अद्याप मोकाट असल्याने परतूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतिने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत गुन्हेगाराला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
अधिक माहिती अशी की, परतूर तालूक्यातील आष्टी जवळील आनंदगाव येथील लिंबाजी उर्फ जिजा रंगनाथ शिंदे या वाळूमाफीयाने आमच्या अवैध वाळू वाहतूकीची बातमी का टाकतो? वाहनाचे फोटो का काढले ? असे म्हणत १४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता पत्रकार आवटे यांच्या भावाच्या हॉटेल वर येवून लाकडाच्या दांडक्याने पत्रकार आवटे व त्यांच्या भावाला मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली.तसेच गळ्यातील सोन्याची चैन व रोख रक्कम घेवून पसार झाला. पत्रकार आवटे यांनी वाळू माफिया विरोधात आष्टी पोलीसात १५ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली. आष्टी पोलीसांनी संबधीत वाळू माफीया शिंदेवर थातूर मातूर कलमान्वये गुन्हा दाखल केल्याने एक प्रकारे वाळू माफियाला सहकार्य करण्याचे काम केले. या घटनेची योग्य चौकशी करुन वाळू माफिया शिंदेला अटक करून पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी यांना पत्रकारांच्या शिष्टमंडळाने निवेदनाव्दारे केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी विविध पत्रकार संघटेनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. तसेच कारवाई करण्यात आली नाही तर पत्रकाराकडुन आंदोलन करण्याचा ईशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
दरम्यान आष्टी पोलीस व वाळू माफिया यांचे घनिष्ट संबंध असल्याचे यापुर्वीही अनेकदा उघड झालेले आहे. वाळू माफिया सोबत पोलीसांची उठबस असल्याने वाळू माफियांचे धाडस वाढल्याने पत्रकारावर हल्ला करायचे धाडस ते करु लागले आहेत. या प्रकारातून पुढे जिवे मारण्याची देखील घटना घडण्याची शक्यता असल्याने या कडे वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच महसूल प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.