Site icon सक्रिय न्यूज

ध्येयाप्रत जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी – सुनीता पाटील….!

ध्येयाप्रत जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी – सुनीता पाटील….!
केज दि.१७ – तालुक्यातील सारणी आनंदगाव येथील पुरुषोत्तमदादा सोनवणे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हळदी कुंकाचा तसेच आदर्श महिलांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांची उपस्थिती होती.तर अध्यक्ष म्हणून संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती मंदाकिनी सोनवणे ह्या होत्या.
                 सारणी आनंदगाव येथील वीर हनुमान शिक्षण संस्थांच्या संचलित पुरुषोत्तम दादा सोनवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये दरवर्षी परिसरातील आदर्श महिलांचा सन्मान केला जातो. आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर हळदी कुंकवाचा कार्यक्रम ही आयोजित केला जातो. शाळेमधील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांच्या माता पालक या कार्यक्रमाला हजेरी लावतात. शाळेच्या सहशिक्षिका उज्ज्वला शिंदे यांच्या संकल्पनेतून सदरील कार्यक्रमांमध्ये महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन ही केल्या जाते. आणि त्यांच्याही कलागुणांना वाव देण्याचे काम शाळेच्या वतीने करण्यात येते. यावर्षी आदर्श महिला म्हणून सारणी आनंदगाव येथील सखुबाई रामभाऊ सोनवणे तर आनंदगाव येथील सुशीला बब्रुवान गायकवाड या दोन महिलांना आदर्श महिला म्हणून सत्कारीत करण्यात आले.
              यावेळी कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीमती पाटील यांनी बोलताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी कुठले तरी एखादे ध्येय उराशी बाळगून त्या ध्येयाप्रती जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी असा मोलाचा सल्ला दिला. तर ग्रामीण भागातील मुली ह्या स्वावलंबी असतात, जबाबदारी ची जाणीव त्यांना लवकर होते असे मत व्यक्त केले. तसेच ग्रामीण भागात एवढा भव्य कार्यक्रम आयोजित केला जात असल्याने आनंद व्यक्त करत कार्यक्रमाच्या संयोजिका उज्ज्वला लोमटे यांचे कौतुक केले.
                   कार्यक्रमासाठी परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थिती लावली होती आणि मोठ्या प्रमाणावर महिलांसाठी ठेवलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी नोंदवला. यामध्ये प्रीती अशोक सोनवणे व ज्योती बालासाहेब सोनवणे यांनी स्पर्धेमध्ये आपले नैपुण्य दाखवत अनुक्रमे प्रथम व द्वितीय येण्याचा मान मिळवला. या विजेत्या महिला महिलांना शाळेच्या वतीने पैठणी व जोडवे देऊन सन्मानित करण्यात आले. तर केज शहरातील इंटेल कॉम्प्युटर च्या वतीने संचालिका संचालिका विजया सत्वधर व संचालक गणेश सत्वधर यांनीही चांदीचे नाणे देऊन सन्मानित केले.
            दरम्यान, इंटेल कॉम्प्युटर च्या वतीने घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण ही करण्यात आले. यामध्ये वैष्णवी हनुमंत गायकवाड, वैष्णवी संजय गायकवाड आणि अनुष्का उत्तरेश्वर सोनवणे या विद्यार्थिनींनी प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला.
शेअर करा
Exit mobile version