केज दि.२० – समाजामध्ये दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढू लागली आहे. आणि म्हणून त्या स्पर्धेमध्ये आपणही कुठे मागे पडू नये-अशी समाजातील प्रत्येक घटकांची धडपड असते. असाच काहीसा प्रकार शिक्षण क्षेत्रामध्ये ही सुरु झाला असून शिक्षणामध्ये अगदी कमी वयातच बालकांमध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये आपणही कुठेतरी दिसावं यासाठी पालक कुटुंबाचा, स्वतःचा विचार न करता आपल्या पाल्यांना चांगल्यात चांगलं शिक्षण मिळावं यासाठी घरापासून दूर ठेवत आहेत. मात्र घरापासून दूर ठेवल्यानंतर शिक्षण होतं का ? याच्यावर निरीक्षण जर नसेल तर मात्र कुटुंबाची वाट लागायला वेळ लागत नाही. असाच काहीसा प्रकार केज तालुक्यातील एका कुटुंबा बाबत घडला आहे.
मुलांना शिक्षणासाठी चांगल्यात चांगल्या शाळा महाविद्यालयात व क्लासेसला ठेवण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. आपल्या मनामध्ये जे स्वप्न आहे ते आपल्या पाल्याने साकार करावे यासाठी पालकांची धडपड सुरू असते. मग पालकांना आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी जी चिंता असते त्या चिंतेतून मुलांना घरापासून दूर शिक्षणासाठी ठेवल्या जाते. लाखो रुपये खर्च केल्या जातात मात्र त्याला ज्या ठिकाणी ठेवले आहे त्या ठिकाणी जो उद्देश डोळ्यासमोर आहे तो साध्य होत आहे की नाही ? याकडे पालकांचे म्हणावे तेवढे लक्ष नाही. बाहेरगावी मुलगा ठेवला म्हणजे तो त्याला नेमून दिलेले काम अगदी न चुकता करत असेल किंवा इतर मार्गाचा अवलंब करत नसेल असा काहीसा भ्रम पालक मनात ठेवून अगदी निर्धास्त होतात. मात्र बाहेरगावी ग्रामीण भागातून गेलेले मुलं त्या वातावरणामध्ये गोंधळून जातात आणि त्या वातावरणाचा परिणाम म्हणून काही विद्यार्थी मात्र वेगळ्याच मार्गाचा अवलंब करताना दिसत आहेत.
असाच काहीसा प्रकार केज तालुक्यातील आवसगाव येथील एका कुटुंबा बाबत घडलेला आहे.आवसगाव येथील एका कुटुंबातील मुलाला लातूर येथे शिक्षणासाठी ठेवले. बार्शी रोडवर राहण्याची व्यवस्था केली. क्लासेसला लाखो रुपये भरले आणि आता चांगल्या प्रकारे शिक्षण होईल अशी अपेक्षा पालकांच्या मनामध्ये निर्माण झाली. मात्र घडले भलतेच. त्या ठिकाणी वातावरणाचा परिणाम झाला आणि नको ते झाले. तो मुलगा ज्या ठिकाणी राहत होता त्याच ठिकाणी एक दहावी वर्गातील मुलगीही शिकत होती आणि अचानक एके दिवशी दोघेही गायब झाले. सर्वत्र शोधाशोध केली मात्र दोघांचाही ठाव ठिकाणा लागला नाही. म्हणून मुलीच्या वडिलांनी लातूर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. आणि त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आणि शोधा शोध सुरू झाली. आणि त्यादरम्यान गातेगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या चिंचोली बल्लाळ परिसरामध्ये एका विहिरीमध्ये सदरील मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. आणि पोलिसांना शंका आली म्हणून विहिरीमध्ये शोध घेतला असता त्या मुलाचाही मृतदेह त्याच विहिरीमध्ये गाळामध्ये फसलेल्या अवस्थेत आढळून आला. दोघांचे मृतदेह बाहेर काढले आणि उत्तरीय तपासणी झाल्यानंतर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये आवसगाव येथे त्या मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि मुलीवरही ती ज्या गावची होती त्या गावी अंत्यसंस्कार झाले. प्रश्न एवढा आहे की आपण मुलाला बाहेरगावी शिक्षणासाठी ठेवल्यानंतर तो नियमितपणे क्लासेसला जातो का? त्याची मित्र मंडळी कोण आहे? तो इतर वेळी काय करतो? याच्यावर पालकांनी अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. अन्यथा शिक्षणाच्या नावाखाली बाहेरगावी जाऊन अशाप्रकारे घटना घडणार असतील तर याचा कुठेतरी विचार होण्याची गरज आहे. आजच्या या स्पर्धेच्या दिवसांमध्ये आपल्या पाल्यांना कुठे ठेवायचे आणि ठेवले तर कशा पद्धतीने त्याच्यावर लक्ष द्यायचे हे अगोदर पालकांनी मनात ठरवले पाहिजे. अगदी बाल वयामध्ये मुलं बाहेरगावी असल्यानंतर वातावरणाचा परिणाम म्हणून ते इतर गोष्टीकडे आकर्षित होतात. कारण त्यांचं ते वयच असतं. मात्र त्या वयामध्ये पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांच्यावर लक्ष देण्याची गरज असून त्या वयातून अगदी सही सलामत त्यांना मार्गस्थ करण्याचे काम हे आपल्या सर्वांचे आहे. आज आवसगाव येथील कुटुंबावर जी वेळ आलेली आहे ती वेळ कुणावरही येऊ नये असे जर वाटत असेल तर महत्त्व शिक्षणाला जरी दिले तरी त्याच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी होते आणि ज्या उद्देशाने आपण त्याला बाहेरगावी ठेवलेला आहे तो उद्देश सफल होतोय का? याकडे बारकाईने लक्ष द्यावे दिले तरच शिक्षण आणि आपला उद्देश साध्य होईल.त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे.