पत्रकारितेत येणं सोपं आहे, आवड म्हणून, गरज म्हणून या क्षेत्रात कोणालाही येता येतं, पण या क्षेत्रात टिकणं, उभं राहणं आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणं सोपं नसतं, त्यासाठी लागते ती साधना किंवा धडाडी. ग्रामीण भागातून आल्यानंतर तर पत्रकारिता करताना अनेक आव्हानं असतात, त्यातही वय लहान असेल तर विचारायलाच नको. अनेकदा त्याचे मुद्दे, त्यानं घेतलेली भूमिका, तो विचारत असलेले प्रश्न योग्य असले तरी कधी चेष्टा म्हणून, कधी उपहास म्हणून, कधी असूया म्हणून त्याच्याकडे ‘कालचा पोरगा’ म्हणून दुर्लक्ष करण्याचे प्रसंग देखील अनेक येतात. अशा अनेक प्रसंगातून जात, अनेक चढउतार अनुभवत, एखाद्या बातमीसाठी अभिनंदनाचा पाऊस तर लगेच दुसऱ्या एखाद्या बातमीसाठी ट्रोल होणं, हे सारं अंगावर घेत केज तालुक्यातील होळ सारख्या ग्रामीण भागातून आलेलं शुभम खाडे हे नाव आज बीडच्या पत्रकारितेत सुपरिचित झालेलं आहे. शुभम आक्रमक आहे तितकीच अभ्यास करण्याची, जाणून घेण्याची मानसिकता त्याच्यात आहे. त्याच्या धडाडीला बालाजी मारगुडे यांनी तितकीच खंबीर साथ दिलेली आहे. पत्रकारितेच्या प्रवासात अनेक टक्के टोणपे अनुभवत आज शुभम खाडे चा त्र्यंबक आसरडोहकर स्मृती पुरस्काराने सन्मान झाला. अंबाजोगाई शहरातला हा पुरस्कार खरचं ‘मानाचं पान’ आहे. या पुरस्काराने शुभमचा होत असलेला गौरव निश्चितच आनंददायी आहे. हा सन्मान एका नवोदित धडाडीचा आहे, यातून शुभमच्या पत्रकारितेला अधिकच बळ मिळेल या अपेक्षेसह शुभम खाडे चे अभिनंदन. शुभम शुभेच्छा, तुझा अभिमान आहेच, आणखी मोठा हो, अन् हो आणखी व्यापक देखील होण्याचा प्रयत्न कर…..!
(दैनिक प्रजापत्र चे सहसंपादक संजय मालाणी यांच्या लेखणीतून)